सातारा - म्हसवड येथील बेकायदेशीरपणे अस्तित्वात ठेवलेल्या सरंजामशाहीचा बिमोड करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव दहिवडी येथे आंदोलन करणार आहेत. प्रांत कार्यालयासमोर ११ फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी दिली.
राजकीय दबावातून कृत्ये
पाटणकर म्हणाले, ''ब्रिटिश राजवट संपुष्टात आली, देशात लोकशाही आली. परंतु म्हसवड भागातील सरंजामशाही अजुनही सरकारने अस्तित्वात ठेवली आहे. कुळांच्या जमिनीचे आम्हीच मालक आहोत, असे कागदोपत्री प्रशासन यंत्रणेस बतावणी करुन येथील सरंजामशाहांनी त्यांच्या वारसांची नावे आज अखेर शासन यंत्रणेवर राजकीय दबाव टाकून सात-बारा सदरी ठेवली आहेत. फार वर्षांपासून येथील कुळधारक शेतकरी कसत असलेल्या शेतजमिनीवर मालकी हक्काची १६ आणेवारीची नोंद असतानाही सरजामशहांनी कुटुंबांचे बोगस कागदोपत्री वाटपपत्र केले. प्रशासनावर दबाव टाकून आणखी जादा १६ आणेवारी नोंद करुन ३२ आणेवारीचे सातबारा उतारे अस्तित्वात आणल्याची कमाल करून दाखवली आहे.
चुकीच्या सातबारांमुळे अडचणीत वाढ
शासनास अद्यापही म्हसवड, खडकी, हिंगणी या गावासह ठिकठिकाणच्या वादग्रस्त सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करणेच शक्य झाले नाही. चुकीचे सातबारा दुरुस्ती करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे वेळोवेळी विनंती केली. मात्र शासनाने त्याची दखलच घेतली नाही. ३२ आण्याचा हा सातबारा १६ आणे म्हणजे जमिनीचा मालक कोण करायचा? हाच खरा वादाचा मुद्दा सरकारपुढे सध्या आहे. सातबाराची संगणकावर अचूक नोंद न झाल्याने पिक कर्ज, नुकसान भरपाई, सरकारकडून मिळणारी मदत, अनुदाने, पिकविमा हप्ते भरणे यासह पंतप्रधान किसान योजना आदींच्या लाभापासून शेतकरी गेली चार वर्षे वंचित राहिलेले आहेत, असेही डाॅ. पाटणकर यांनी सांगितले.