सातारा - जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाचे नुकसान होऊन नये म्हणून जिल्हा कृषी विभागाने तब्बल 7 हजार टन फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी समन्वय घडवून आणल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संकट आणि लॉकडाऊन या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल ७ हजार १३५ टन शेतमालाची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेऊन शेतकरी व प्रत्यक्ष ग्राहक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावली. लॉकडाऊन काळात सर्व बाजार बंद असल्याने शेतमाल शेतामध्येच पडून राहण्याची भिती होती. ही अडचण लक्षात घेत शेतकरी व ग्राहक यांच्यात केवळ दुवा म्हणून काम करत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिली आहे.
याबाबत विजयकुमार राऊत म्हणाले, या शेतमालामध्ये ४ हजार ५४३ टन भाजीपाला आणि २ हजार ५९१ टन विविध फळांचा समावेश आहे. ही सर्व विक्री ऑनलाईन आणि थेट स्वरुपात झाली. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आजअखेर, केवळ तीन महिन्यांत ही विक्री झाली. विविध शेतकरी गट तसेच शेतकऱ्यांना शहरातील सोसायट्यांशी समन्वय साधून लॉकडाऊन काळात फळे व भाजीपाला पुरवठा नियमित करण्याचे कामकाज कृषी विभागाने केले. शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाल्याला चांगला दर मिळाला. तसेच शेतकरी व ग्राहक, अशा दोहोंना फायदा झाला.
कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी पुणे येथील विविध सोसायटी ग्राहक म्हणून मिळवून दिल्या. यानंतर या समुहामार्फत आम्ही ४२ ते ४३ शेतकऱ्यांचा भाजीपाला एकत्रीत करुन तो पुणे येथे नेऊन विकत होतो. यामधून आम्हा सर्व शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळातही चांगला नफा मिळाल्याचे पेरले ( ता. कराड) येथील स्वयं: सहायता समूहाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले यांनी सांगितले. कृषी विभागाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये १० ते १५ शेतकऱ्यांचा मिळून ५०० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक गटांची स्थापना केली. या उत्पादक गटांच्या मालाची विक्री आणि थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी साधारण १६० विक्री केंद्र कार्यान्वित करुन दिले, असल्याचे सांगण्यात आले.