सातारा - मलकापूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या सहाशेपर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता मलकापूर शहर दोन टप्प्यात बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. येत्या शनिवारपासून दोन टप्प्यात मलकापूर शहर बंद राहिल.
सर्वपक्षीय बैठकीला नगराध्यक्ष नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, विरोधी पक्षनेते अजित थोरात, महिला व बालकल्याण सभापती आनंदी शिंदे, नगरसेविका नंदा भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशिद, भाजप शहराध्यक्ष सूरज शेवाळे, पोलीस पाटील प्रशांत गावडे, सागर जाधव, राजू मुल्ला, जयंत कुराडे, आनंदराव सुतार, गणेश चव्हाण, हणमंत शिंगण, अण्णासाहेब काशिद यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व व्यवसायिक उपस्थित होते.
मार्चपासून आजअखेर मलकापुरात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५९५ वर पोहोचली आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मलकापूरमध्ये तीन हजार रॅपिड टेस्ट करण्याची तरतूद आणि दोन ऑक्सिजन मशीन उपलब्ध करण्याची तयारी नगरपालिकेने केली आहे.
दरम्यान, ज्या नागरिकांना होम क्वारंटाईन केले आहे ते बेधडकपणे बाहेर फिरत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन अत्यंत गरजेचा असून लॉकडाऊनला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन काशिद यांनी सांगितले. शिवसेनेच्यावतीने मलकापूरकरांसाठी आक्सिजन मशीन देणार असल्याचेही काशिद यांनी सांगितले.