सातारा - विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून शाहूपुरी पोलिसांनी घेतलेल्या कोविड चाचणीत धक्कादायक निकष बाहेर आले आहेत. यात १३५ जणांच्या टेस्ट केल्यानंतर १५ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
कस्तुरबा रुग्णालयाची मदत -
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करंजे नाक्यावर दुपारी अचानक पोलिसांनी कारवाईची धार तीव्र करत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना (अँटिजेन) टेस्ट घेण्याची धडक मोहीम राबवली. याकामी पालिकेच्या कस्तुरबा गांधी प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घेण्यात आली.
कोविड चाचणीचा धडाका -
कोविड रुग्णांची वाढती संख्या थोपवण्यासाठी कडक निर्बंधांची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली. तरीही लोक रस्त्यांवर विनाकारण फिरताना आढळुन येत आहेत. कोणाच्या दुचाकी जप्त कर तर कोणाच्या दुचाकीतील हवा सोड, अशा स्वरुपाची कारवाई करुन आज पहिल्या दिवशी पोलीस नागरिकांना संचारबंदीच्या काळात घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. तथापि, विनाकारण रस्त्यावर वळचणीला बसणारे, दुचाकीवर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही आहे. त्यामुळे शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी अशा विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी घेण्याचा धडाका सुरू केला. संचारबंदी काळात वेळोवेळी अशा चाचण्या घेण्यात येतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलीसांचे आवाहन -
लक्षणविरहीत अनेक लोकांना कोविडची बाधा आहे. असे लोक सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत आहे. नागरिकांनी बाहेर न फिरता घरीच थांबावे. लॉकडाऊनच्या सुचनांचे तंतोतंत पालनकरुन नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.