सातारा - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मंगळवारी बिनविरोध झाली. सहकार मंत्र्यांनी आपले पुत्र जसराज पाटील यांना संचालकपदी संधी देऊन त्यांचे राजकीय लाँचिंग केले आहे. संचालक मंडळात 10 विद्यमान आणि 11 नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा - कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक, तपासात निष्पन्न
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया 6 जानेवारीला सुरू झाली होती. निवडणुकीसाठी 165 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि.28) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पाटील यांनी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांशी चर्चा केली. त्यानंतर 21 वगळता अन्य सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. सह्याद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र हे कराड, कडेगाव, सातारा, खटाव आणि कोरेगाव, अशा पाच तालुक्यात आहे. त्यामुळे पाटील यांनी संचालक मंडळातही या सर्व भागांना संचालकपदाची संधी देत समतोल साधला आहे.
हेही वाचा - कराडातील गडप्रेमीचा धुळोबा डोंगरावर ह्रदयविकाराने मृत्यू
गटनिहाय बिनविरोध निवड झालेले उमेदवार
- कराड गट- बाळासाहेब पाटील, जशराज पाटील, रामचंद्र पाटील
- तळबीड गट- माणिकराव पाटील, सुरेश माने, बजरंग पवार
- उंब्रज गट- सर्जेराव खंडाईत, दत्तात्रय जाधव
- कोपर्डे हवेली गट- रामदास पवार, शंकर चव्हाण
- मसूर गट- मानसिंगराव जगदाळे, संतोष घार्गे, लालासाहेब पाटील
- वाठार किरोली गट- कांतीलाल भोसले, वसंत कणसे, अविनाश माने
- महिला राखीव गट - शारदा पाटील, लक्ष्मी गायकवाड
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग - जयवंत थोरात
- भटक्या जाती जमाती प्रवर्ग - लहूराज जाधव
- मागास प्रवर्ग- संजय कुंभार