सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता साताऱ्यात आठ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 146 वर पोहोचली आहे.
सातारा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दाखल असलेला मुंबई येथून प्रवास करुन आलेला 33 वर्षीय पुरुष, मायणी येथील अकोला येथून प्रवास करुन आलेला 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील म्हासोली गावातील कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष आणि तीन महिला या आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबई येथील रुग्णालयात कोरोनावर उपचार घेऊन आलेल्या खंडाळा येथील 58 वर्षीय महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेवर मुंबई येथे उपचार झाल्याने तिची गणना जिल्ह्यात केली जाणार नाही. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 146 आहे. यापैकी 71 जणांवर उपचार सुरु आहेत. तर, 73 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.