कराड (सातारा) - ऑनलाईन शिक्षणासाठी अॅण्ड्रॉईड मोबाईल नसल्याच्या नैराश्यातून ओंड (ता. कराड) गावातील दहावीत शिकणार्या साक्षी पोळ या 15 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. साक्षीच्या आत्महत्येनंतरही तिच्या सातवीत शिकणाऱ्या भावालासुद्धा अॅण्ड्रॉईड मोबाइल अभावी ऑनलाइन शिक्षण मिळाले नाही. मुलीचा विरह आणि एकुलत्या एका मुलाच्या भविष्याची काळजी, अशा प्रसंगाला तोंड देत स्वाती पोळ मजुरी करत संसाराचा गाडा ओढत आहेत.
मोबाईलसाठी रोज जावे लागत होते शेजाऱ्यांकडे -
कराड-रत्नागिरी मार्गावरील ओंड सारख्या प्रगत गावातील पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूलमध्ये साक्षी आबासाहेब पोळ ही मुलगी दहावीत शिकत होती. 22 मार्च 2020 ला देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला आणि सर्व काही ठप्प झाले. सात महिन्यांनंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. शाळांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. परंतु, हातावर पोट असणार्या कुटुंंबातील मुलांना महागडा अॅण्ड्रॉईड फोन विकत घेणे शक्य नव्हते. साक्षीच्याही घरची परिस्थिती हालाखीची होती. ती आईकडे मोबाईलची मागणी करत होती. मात्र, पैसे नसल्यामुळे नंतर मोबाईल घेऊ, असे सांगत आई वेळ मारून नेत होती. ऑनलाईन शिक्षणासाठी चार महिने साक्षी शेजार्यांकडे आणि मैत्रिणींकडे अभ्यासासाठी जात होती. मोबाईलसाठी रोज शेजार्यांच्या घरी जावे लागत असल्याने तिला नैराश्य आले होते.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा मुद्दा लोकसभेत मांडला -
साक्षीची आई स्वाती पोळ या 26 सप्टेंबर 2020 रोजी मजुरीसाठी गेल्यानंतर साक्षीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कराडसारख्या पुढारलेल्या तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे समाजमन अस्वस्थ झाले होते. सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत यासंदर्भातील मुद्दा उपस्थित करून मोबाईलअभावी विद्यार्थिनीने आत्महत्या केली असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. शेतकरी, कष्टकर्यांच्या मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध होत नाहीत. अशा मुलांचे भवितव्य कसे घडणार, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने या संदर्भात ठोस प्रयत्न करण्याची मागणी देखील त्यांनी केली. माझ्या मुलीला मोबाईल नाही मिळाला. आता किमान गरीब कुटुंबातील मुलींना मोबाईल मिळाला तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असे सांगत स्वाती पोळ यांनी खा. पाटील यांचे आभार मानले.
मुलाला तरी शिक्षण मिळावे हीच अपेक्षा -
पतीच्या निधनानंतर स्वाती पोळ या मजुरी करून गेली वीस वर्षे कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. लॉकडाऊनमध्ये कष्टकऱ्यांच्या हाताला काम नव्हते. याचा मोठा फटका हातावर पोट असणार्यांना बसला. बेताच्या परिस्थितीमुळे दहावीत शिकणार्या साक्षीला मोबाईल मिळू शकला नाही. म्हणून तिने आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूचा धक्का त्या आजही पचवू शकलेल्या नाहीत.
आपल्या लहान मुलाबरोबर त्या छोट्या झोपडीवजा घरात राहत आहेत. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून गुजराण करत आहेत. मुलीच्या मृत्यूनंतर सरकारी अधिकारी, पुढार्यांची सांत्वनासाठी रीघ लागली होती. पण, कोरड्या सांत्वनाचा काय उपयोग? दिवसभर शेतात राबल्याशिवाय दोन वेळच्या जेवणाची सोय होत नाही. साक्षीच्या आईने मुलीच्या मृत्यूचे दु:ख उराशी कवटाळले आहे. मुलगी तर गेली, पण मुलगा अक्षय याला तरी चांगले शिक्षण घेता यावे, म्हणून त्या कष्ट उपसत आहेत. मृत साक्षी हिचा लहान भाऊ अक्षय याला देखील मोबाईल अभावी ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे तो काही दिवस घरातच होता. आता शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शाळेत जाऊन तो शिकत आहे.
तेव्हाच पडते हाता-तोंडाची गाठ -
दारिद्य्र आणि कष्ट पाचवीलाच पुजलंय. मुलगी पाच वर्षांची आणि मुलगा पोटात असताना पतीचे निधन झाले. तेव्हापासून मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितेय. दिवसभर मजुरी करायची तेव्हा कुठे हाता-तोंडाची गाठ पडते, असे सांगताना स्वाती पोळ यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. आता मुलाचाच आधार आहे. तो सातवीत शिकत आहे. त्याच्या शिक्षणासाठी पडेल ते कष्ट उपसायची तयारी आहे, असेही त्या म्हणाल्या.