कराड (सातारा) - विजापूर-गुहागर राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या महामार्गावर कराड-कोयनानगर (घाटमाथा) दरम्यानच्या रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरणासह काँक्रिटीकरणाला दीड वर्षापूर्वी सुरूवात झाली. मात्र, कासवगतीमुळे या मार्गावरील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. तसेच संपूर्ण मार्ग खड्डेमय झाला आहे. खड्डे आणि धुळीमुळे कराड-पाटण मार्गाने प्रवास करणारे वाहनधारक वैतागले आहेत. त्यामुळे बर्याच वाहनधारकांनी वाट वाकडी करून तांबवे, मरळी, मोरगिरीमार्गे थेट हेळवाकहून पुढे कोकणात जाण्याचा मार्ग शोधला आहे.
वाहनांच्या नुकसानीबरोबरच शारीरिक त्रास -
विजापूर-गुहागर मार्गाने थेट कोकणात प्रवेश करता येतो. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपला भाजीपाला याच मार्गाने विक्रीसाठी कोकणात घेऊन जातात. तसेच कोकणातील बंदरावरून मासे घेऊन येणारी वाहने याच मार्गावरून सातारा, सांगली, मिरज भागात येतात. चिपळूण, रायगड, रोहा येथे मोठ्या केमिकल कंपन्या असल्यामुळे टँकर, कंटेनरसारखी अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करतात. या सर्व परिस्थितीमुळे विजापूर-गुहागर हा वर्दळीचा मार्ग समजला जातो. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर विजापूर-गुहागर दरम्यानच्या मार्गाचे रूंदीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरण सुरू झाले. परंतु, संथगतीमुळे रस्त्याच्या कामाला खूप विलंब झाला आहे. रस्त्यातील छोट्या पुलांची, मोर्यांची कामे अर्धवट आहेत, अशा ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. पूर्वीचा डांबरी रस्ता उकरण्यात आला आहे. त्यावर मातीचा भराव टाकला असल्याने धुरळा उडत आहे. तसेच रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने वाहनांची धडधड वाढली आहे. वाहनांच्या नुकसानीबरोबरच वाहनधारकांचा शारीरिक त्रास देखील वाढला आहे.
गेल्या दीड वर्षात अनेक वाहनांचा अपघात -
कराड तालुक्याच्या हद्दीतील काम पुर्णत्त्वास गेले आहे. परंतु, पाटण तालुक्याच्या हद्दीत विहे घाट, निसरे या गावापासून पुढे रस्त्याचे काम कमी आणि खड्डे जास्त, असे चित्र पहायला मिळत आहे. ओढ्यांवरील छोट्या पुलांची कामेही अर्धवट स्थितीत आहेत. तसेच रस्त्याच्या एका बाजूचे काही अंतर काम पूर्ण करून अर्धवट सोडले आहे. तर, दुसरी बाजू पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. अर्धवट कामांमुळे या मार्गाची परिस्थिती भीषण आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दीड वर्षात अनेक वाहने पलटी होऊन तसेच अपघातग्रस्त होऊन लोक मृत्युमुखी पडले आहेत. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे मातीचा धुरळा उडत आहे. ही धूळ रस्त्याकडेला असणार्या दुकानात साचत आहे. मातीचा भराव टाकण्यात आल्यानंतर ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणीही मारले जात नसल्याने व्यावसायिक चांगलेच त्रस्त आहेत. रस्त्याची ही परिस्थिती पाहून अनेक लोक कोल्हापूरमार्गे कोकणात जाणे पसंद करत आहेत. तसेच काही वाहनधारक तांबवे फाटामार्गे, मारूल हवेली, मरळी, मोरगिरीमार्गे हेळवाकमधून पुढे कोकणाकडे जात आहेत.
नोकरीवर जाताना वेळेआधी निघावे लागते -
कराड आणि पाटण येथील प्रशासकीय कर्मचारी दररोज या मार्गावरून प्रवास करतात. काही लोक एसटीने तर काही जण मोटरसायकलवरून ये-जा करतात. अशा कर्मचार्यांना नोकरीवर जाताना वेळेआधी एक-दीड तास लवकर घरातून निघावे लागते. खड्डे आणि खडीमुळे गाड्या नादुरूस्त होण्याचेही प्रमाण अधिक आहे. पोलीसस्टेशन, न्यायालय, बांधकाम विभाग, पंचायत समिती अशा ठिकाणच्या कर्मचार्यांना या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - अतुल भातखळकर