सातारा - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यात्रेसंदर्भात पूर्वनियोजन बैठक मंगळवारी 17 मार्चला शिंगणापूरला होणार आहे. या बैठकीत यात्रा भरविण्यास निर्बंध असल्याचे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी दिली.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा 25 मार्च ते 6 एप्रिल अखेर होणार आहे. या यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकणसह राज्यभरातून सुमारे 8 ते 10 लाख भाविक यात्रेकरू येत असतात. शंभू महादेव विवाहसोहळा तसेच कावडी सोहळ्यासाठी दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने शिंगणापूर यात्रेबाबत भाविकांसह ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
हेही वाचा - राज्यात 'या'ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिला गुन्हा दाखल
प्रशासकीय स्तरावर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्तीग्रस्त जिल्ह्यातील महत्वाचे सण समारंभ, गर्दीचे कार्यक्रम, मेळावे यासह यात्रा-जत्रा यावर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत. यात्रा कालावधीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने शिंगणापूर यात्रेवरही प्रतिबंध घातले असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. यात्रा काळात गर्दी करणे, स्टॉल लावणे, सिनेमा थिएटर लावणे, मनोरंजक कार्यक्रम भरविणे यासारख्या बाबींवर प्रशासनाने निर्बंध घातले. यात्राकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रम संबंधित पुजारी यांनी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागासह सर्वच विभागांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. शिंगणापूर यात्रा काळातही याबाबत विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी सांगितले.
हेही वाचा - पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा दाखल
शिंगणापूर यात्रेच्या अनुषंगाने कावडीधारक भाविक, देवस्थान समिती, ग्रामपंचायत प्रशासन स्थानिक ग्रामस्थ यांच्यासमवेत 17 मार्चला बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत यात्रेवर प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्राकाळात खबरदारी घेण्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शिंगणापूर यात्रेवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले असून भाविकांसह, देवस्थान समिती, पुजारी, सेवाधारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले आहे.