सातारा - सलग दुसऱ्या दिवशी पावसाने माण तालुक्याला झोडपून काढले. या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे, नाले खळाळून वाहिले तर बंधारे भरुन गेले. मात्र, अजूनही माणगंगा खळाळली नाही. कालच्या जोरदार पावसाने बहुतांशी ठिकाणी 40 मी.मी. ते 50 मी.मी. पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या, नाल्यांना पूर आला. ओढ्यांवरील सिमेंट बंधारे भरुन वाहत आहेत.
ओढे भरभरुन वाहिले मात्र माणगंगा नदीला अजून पूर आलेला नाही. कालच्या पावसाने माणगंगेच्या उगमाकडील कळसकरवाडी, गाडेवाडी, शिंदी खुर्द येथील नदी पात्र प्रवाहीत होवून पाणी भांडवली हद्दीत आले आहे. तिथून पुढील नदी पात्र अजूनही कोरडेच आहे. या पावसामुळे बळीराजाचे चेहरे खुलले असून अजून काही दिवस अशाच पावसाची अपेक्षा माणदेशी जनता करत आहे.