सातारा- शिक्षणाची गंगा गरिबाच्या झोपडीपर्यंत नेणारा आधुनिक भगिरथ म्हणून कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांची ओळख आहे. त्यांची आज पुण्यतिथी आहे. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे त्यांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी करण्यात आली आहे. गेल्या ३१ वर्षात आज प्रथमच संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह राज्यभर पसरलेल्या लाखो रयत सेवकांनी कर्मवीर आण्णांच्या स्मृतींना मनोमन अभिवादन केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म त्यांच्या आजोळी कोल्हापूर संस्थानातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला. ते ऐतवडे बुद्रुक येथील पाटील घराण्यातील होते. सुरुवातील भाऊरावांनी काही ठिकाणी नोकरी केल्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांकडून प्रेरणा घेऊन लोकांच्या सहकार्याने काले (ता. कराड) येथे ४ ऑक्टोबर १९१९ ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे असा रयतच्या शाखांचा महाराष्ट्रभर विस्तार केला. आज संस्थेच्या ७३९ शाखा, १६ हजार कर्मचारी आणि तब्बल साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी 'रयत'च्या वटवृक्षाखाली शिक्षण घेत आहेत.
१९५९ मध्ये भाऊराव पाटील यांना राष्ट्रपतींकडून 'पद्मभूषण' हा किताब मिळाला. पुणे विद्यापीठाने 'डी.लिट.' ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव केला. जनतेने पूर्वीच त्यांना 'कर्मवीर' ही उपाधी बहाल केली होती. अशा या कर्मयोग्याचा पुण्यातील ससून रुग्णालयात ९ मे १९५९ रोजी हृदयविकाराने निधन झाले. दरवर्षी ९ मे हा कर्मविरांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. कर्मविरांच्या समाधीपुढे नतमस्तक होऊन आण्णांप्रती कृत्यज्ञता व्यक्त करण्यासाठी शेकडो रयतसेवक, पदाधिकारी, विद्यार्थी साताऱ्यात कर्मवीर समाधी परिसरात येतात. यानिमित्ताने संस्थेमार्फत नव्या योजना, नवे उपक्रम जाहीर केले जातात.
संस्थेच्या कार्यकारीणीच्या बैठकीत महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी संस्थेने सर्व कार्यक्रम, समारंभ रद्द केले आहेत. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व कर्मविरांचे नातू डॉ. अनिल पाटील या संदर्भात बोलताना म्हणाले, कर्मवीर पुण्यतिथीचा कार्यक्रम आदरणीय पवारसाहेब कधीही चुकवत नाहीत. १९८९ पासून ते संस्थेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात नेते, नंतर केंद्रीय कृषी मंत्री आदी मोठ्या जबाबदारीच्या पदांवर असतानाही त्यांनी साताऱ्यात कर्मवीर पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावली आहे. संस्थेने ६१ वर्षात प्रथमच, कोरोनाच्या जागतिक संकटामुळे कर्मवीर पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. आज पुज्यनीय आण्णांची पुण्यतिथी आम्हीं सर्वांनी साधेपणाने साजरी केली.
हेही वाचा- कराडमधील आणखी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह