कराड (सातारा) - पाणी सोडण्याची वेळ आली, तर पूर्वसूचना देऊन धरण व्यवस्थापनाने दिवसा पाणी सोडावे. नागरिक बेसावध असताना कोणत्याही धरणातील पाणी रात्री सोडू नये, असे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील सर्व धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनाला दिले.
पाटण तहसील कार्यालयात देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयना धरणासह कृष्णा खोऱ्यातील मध्यम धरण प्रकल्पांमध्ये झालेल्या पाणीसाठ्यासह नियोजनाच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयनानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. भावीकट्टी, कोयना धरण तसेच कृष्णा खोऱ्यातील मध्यम धरण प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
आजमितीला कोयना धरणामध्ये ७८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातच पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे तुर्तास तरी कोयना धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही. पाटण तालुक्यातील कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पांमध्येही मुबलक पाणीसाठा झाला आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरण असो वा मध्यम धरण प्रकल्प असोत, धरण प्रकल्पातील पाणी सोडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली तर याची पुर्वकल्पना देवून धरण व्यवस्थापनाने दिवसाचे पाणी सोडावे, असे आदेश ना. देसाईंनी दिले.
देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून कोयना धरणातील पाणीसाठ्यासह पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर पाणी विर्सगाबाबतची सविस्तर माहिती घेतली. दिवसाचे पाणी सोडले तर किती प्रमाणात पाणी नदीला येणार आहे, याचा अंदाज येतो व दळणवळण असो किंवा नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भाने प्रशासनालाही योग्य नियोजन करता येते, असे शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.