सातारा - जिल्हा संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांनी सातारा जिल्हा दौऱ्यात मास्क न घातलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले. ते सातारा जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचा आढावा घेण्यासाठी विश्रामगृहात आले होते. यावेळी मंत्री, आमदार, आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचा आढावा घेण्यासाठी माजी शिवसेना संपर्कप्रमुख दिवाकर रावते हे सातारा शहरातील शासकीय विश्रामगृहात आले होते. त्याचे आगमन होताच सातारचे सुपुत्र व गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, उपनेते प्रा. नितीन बानूगडे-पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, यशवंत घाडगे, जयवंत शेलार, रामभाऊ रेनाक युवासेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, माजी जिल्हाप्रमुख हणमंतराव चवरे,खटावचे युवराज पाटील, बाळासाहेब जाधव, किशोर गोडसे, रमेश बोराटे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
दिवाकर रावतेंनी केली आठवण -
या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र, काहींच्या तोंडावर मास्क नसल्याने जागरूक संपर्कप्रमुख रावते यांनी त्याची आठवण करून दिली. त्यानंतर लगबगीने खिशात ठेवलेले मास्क तोंडाला लावण्यासाठी घाई घाईत सर्वांनी प्रयत्न केले. मास्क न लावता अनेक शिवसैनिक वावरताना दिसतात. त्यांनी किमान आपल्या नेत्यांचे तरी आदेश मानले पाहिजेत, अशी अपेक्षा सर्व सामान्य जनते कडून व्यक्त होत आहे.
'कोरेगाव' बाबत कुरबुर -
सध्या सातारा जिल्ह्यात भाजप-सेना यांच्यातील राजकीय संघर्ष पाहण्यास मिळत असताना कोरेगाव येथील शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या नावाचा 'स्टिकर पास' भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नलावडे स्वतःचा वाहनाला लावून फिरत आहे. आमदार महेश शिंदे यांनी सेने ऐवजी भाजपा कार्यकर्त्यांना ताकद देण्याची जबाबदारी सांभाळली आहे अशी कोरेगाव तालुक्यात चर्चा होत आहे. दुसरीकडे सेनेच्या आढावा बैठकीला शिवसेनेचे आमदार महेश शिंदे गैरहजर होते. याची ही कुजबुज यानिमित्त ऐकण्यास मिळाली. त्याचा ही कधी तरी शिवसेना नेत्यांनी आढावा घ्यावा अशी मागणी शिवसैनिकांतून होऊ लागली आहे.