सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आगामी काळात आवश्यकता भासल्यास कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने गोंदवले बुद्रुक येथील श्री चैतन्य रुग्णालयाची व भक्त निवासांची पाहणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली.
ब्रम्हचैतन्य महाराज समाधी मंदिर समितीच्या वतीने चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. लॉकडाऊन काळात मात्र हे रुग्णालय देखील बंदच आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आवश्यकता भासल्यास या रुग्णालयाचा वापर करता येऊ शकतो. या उद्देशाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी या रुग्णालयाची संपुर्ण पाहणी केली.
याशिवाय कोरोना रुग्णांचे विलगिकरण करता यावे, म्हणून समाधी मंदिर परिसरातील भक्तनिवासांचीही पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार बी. एस. माने, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.