कराड (सातारा) - विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, सातारा जिल्हा काँग्रेसचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. चव्हाण, थोपटे यांच्यासह प्रणिती शिंदे यांच्या नावाचाही त्यामध्ये समावेश आहे. सध्या या चर्चेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग
राज्यात 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. परंतु, विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अध्यक्षपदासाठी त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे भाजपामधून काँग्रेसवासी झालेल्या नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदावर वर्णी लागली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे दि. 4 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवाळ हे हंगामी विधानसभा अध्यक्ष आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षपदासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांचे नावही चर्चेत आहे. तथापि, या संदर्भात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा - 'ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत सरकारने निवडणुका घेऊ नये'