सातारा - जिल्ह्यात तापमानवाढीमुळे अवघे जनजीवन होरपळून निघाले आहे. त्याच्या जोडीला आता भीषण पाणी टंचाईनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठीही शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, याच जिल्ह्यात महाबळेश्वर पाचगणी परिसराला पर्यटकांच्या सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्यातील ही परिस्थिती पाहता निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने जिल्ह्यातील तसेच राज्यातील पर्यटक महाबळेश्वरच्या पर्यटन स्थळी दाखल होत आहेत. त्यामुळे राज्यात सर्वाधिक पर्जन्यमान होणारा वाई-महाबळेश्वर-पाचगणी परिसर तर दुसऱ्या बाजूला राज्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झालेला माण-खटाव तालुका यामुळे जिल्ह्यातील निसर्गाचा असणारा चमत्कार जिल्ह्यात पाहिला मिळतो.
एकीकडे जिल्ह्यातील पूर्व भागातील तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत. पण जिल्ह्यात पश्चिमेकडे महाबळेश्वर आणि पाचगणीकडे पर्यटक आकर्षक होऊ लागले आहेत. उन्हाच्या दाहकतेपासून उसंत मिळण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाल चमुंचीदेखील झुंबड उडाली आहे. वेण्णा लेक, सनसेट, सनराईझ पॉईंट, टेबल लँडवर खूप गर्दी होत आहे. या सगळ्यांबरोबर सुक्या मेव्यालासुद्धा मागणी वाढली आहे.
डोंगरची काळी मैना करवंदे, जांभूळ मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येऊ लागले आहेत. त्याचा आस्वाद पर्यटक मोठ्या खुबीने घेत आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलातील पायवाट शोधून जात आहेत. अनेक भागात आंबट, तुरट गोड, अशा चवीने चव चाखायला मिळत आहे. बाजारपेठेत डोंगराची काळी मैना म्हणजे करवंदे मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत.