सातारा - "कुठेही कधी साप निघाल्यास दीपाली धाडसाने पुढे जायची आणि साप पकडून ती जंगलात सोडून द्यायची. तिच्या या धाडसाचं आम्हाला नेहमीच कौतुक वाटायचं. एवढी धाडसी मुलगी असं काही स्वतः बर वाईट करेल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं" अशी खंत साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल श्रीमती शीतल राठोड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वनक्षेत्रपाल दीपाली चव्हाण व साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल श्रीमती राठोड या दोघी एकाच बॅचच्या प्रशिक्षणार्थी. वन विभागाच्या कुंडल (जि. सांगली) येथील प्रशिक्षण केंद्रात दोघींनी एकत्र 18 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं. दीपालीच्या आठवणी सांगताना शितल राठोड भावूक झाल्या.
राठोड म्हणाल्या, "दीपाली आणि मी प्रशिक्षण केंद्रात एकाच होस्टेलमध्ये राहत होतो. प्रशिक्षण कालावधीत आम्ही सर्व मैत्रिणींनी खूप एन्जॉय केला. एकत्र अभ्यास केला, स्टडीटूर केल्या. आम्ही 11 महिला प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल म्हणून होतो. वयाने मोठी असल्यामुळे दीपाली मला 'शीतलदी' म्हणूनच हाक मारायची. ती एक धाडसी मुलगी होती. प्रशिक्षण केंद्रांमध्ये कधी साप निघाल्यास दीपाली धाडसाने पुढे जायची आणि साप पकडून ती जंगलात सोडून द्यायची, तिच्या या धाडसाचं आम्हाला नेहमीच कौतुक वाटायचं. एवढी धाडसी मुलगी असं काही स्वतः बर वाईट करेल असा आमच्या बॅचला स्वप्नात देखील वाटले नाही."
दुचाकीवरून केला रेल्वेचा पाठलाग -
''प्रादेशिक विभागात काम करत असताना तिने अनेक धाडसी कामगिरी केल्या. मेळघाट हा मध्यप्रदेशच्या सीमेवरील भाग; अशा भागात एखाद्या महिला अधिकाऱ्यांनं काम करणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही. काही तस्करांचा मुकाबला करताना दीपालीने दुचाकीवरून रेल्वेचा पाठलाग करून पुढच्या स्टेशनवर संशयित तस्करांना जेरबंद केलं होतं. साताऱ्यात तिची आई व बहीण असल्यामुळे ती साताऱ्यातही अधेमध्ये सुट्टीच्या वेळी यायची. कास पठार असो अथवा ठोसेघरचा धबधबा हे पाहायला ती दोन वेळा आली होती. ठोसेघरमध्ये तिचं लग्न झालं. त्या विवाहसमारंभाला मला उपस्थित राहायची संधी मिळाली. दीपाली नेहमीच हसतमुख असायची. तिला कशाचे तरी दुःख- चिंता असेल, असे तिच्या चेहऱ्यावरून कधीच जाणवलं नाही. तिचा हसरा चेहरा कायम स्मरणात राहील, अशा भावना श्रीमती राठोड यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा - दीपाली चव्हाणचे आणखी एका पत्र आले समोर, प्रकरणात आला नवा ट्विस्ट