कराड (सातारा) - कराडमधील 70 वर्ष जुनी असलेली धोकादायक बागवान इमारत मंगळवारी नगरपालिकेने जमीनदोस्त केली. शहरातील आणखी 51 इमारती या धोकादायक स्थितीत आहेत. संबंधित इमारतींच्या मालकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. इमारत मालकांनी या इमारती स्वत:हून पाडाव्यात, अन्यथा नगरपालिका या इमारती जमीनदोस्त करून त्याचा खर्च संबंधित मालकांकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिला आहे.
मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्याच्या कॉर्नरची बागवान इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीमध्ये होती. मालक आणि भाडेकरूंमधील कायदेशीर वादामुळे ही इमारत दोन वर्षांपासून जैसे थे स्थितीत होती. या इमारतीचा काही भाग मागील आठवड्यात कोसळला होता. त्यामुळे नगरपालिकेकडून इमारत धोकादायक असल्याची नोटीस इमारत मालक आणि भाडेकरुंना देण्यात आली होती. इमारत धोकादायक आहे. इमारतीच्या आसपास जाऊ नये, असा सूचना फलकही पालिकेने त्याठिकाणी लावला होता. मंगळवारी पोलीस बंदोबस्तामध्ये नगरपालिका प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने ही इमारत पाडली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
इमारत पाडण्यासाठी भाडेकरुंचा विरोध
इमारत पाडली जाणार असल्याचे समजताच भाडेकरुंनी प्रारंभी विरोध केला. परंतु, नगरपालिका प्रशासनाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. गुलाब बागवान यांच्या मालकीची ही इमारत होती. सुमारे 70 वर्ष जुनी असल्यामुळे इमारत धोकादायक बनली होती. जेसीबीच्या साह्याने ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सुरेश पाटील, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोनाच्या डेल्टा प्लसचा देशात पहिला मृत्यू ; ३ राज्यांत नव्या स्ट्रेनचे ३० रुग्ण