सातारा - सुंदर पिवळी सोनकुसूमची (काॅसमाॅस) फुले सातारा-पुण्यासह पश्चिम घाटावर मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहेत. मात्र, त्यांच्या सौंदर्यावर भाळू नका. हे तण गाजर गवत (काँग्रेस) किंवा रानमोडीसारखे माजून स्थानिक वनस्पतींची विविधता धोक्यात आणू शकते. कासच्या घाटात पोहचलेल्या या काॅसमाॅसपासून कास पठाराला धोका आहे, असा सावधानतेचा इशारा पर्यावरणतील अभ्यासकांनी दिला आहे.
साताऱ्याजवळ तसेच पुण्याच्या कात्रज घाटात पहावे तिकडे सुंदर पिवळ्या फुलांचा गालिचा अंथरल्यासारखा आभास ही सोनकुसूमची फुले निर्माण करत आहेत. साधारण ४ ते ५ फूट उंचीची ही पुष्पवनस्पती मूळ मेक्सिकोमधील आहे. गार्डन प्लांट म्हणून 'काॅसमाॅस' भारतात आणली गेली.
सुंदर पिवळ्या 'सोनकुसूम' फुलांचा कासला धोका; पर्यावरण अभ्यासकांची इशारा घंटा या वनस्पतीच्या उपद्रवाविषयी बोलताना लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा. शेखर मोहिते म्हणाले, ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढते. याच वेळी ती आपल्याकडील वनस्पतींना वाढू देत नाही. स्थानिक वनस्पती विविधतेवर त्याचा परिणाम होतो. जणावरांच्या चाऱ्यावरही त्याचा परिणाम होईल. रस्त्याकडेला आणि बांधापर्यंत पोहचलेले तण भविष्यात शेतपिकाची जागा व्यापण्याचा धोका आहे. 'आज पुण्याहून साताऱ्याकडे येताना महामार्गाच्या दोन्ही बाजूस पिवळी फुले पहायला मिळातात. कासच्या घाटातही ती दिसतात. गाडीच्या चाकाबरोबर वाहून ती कास पठारावर पोहोचल्यास आधिच धोक्यात असलेली कासची दुर्मिळ फुले नष्ट होण्याचा संभव आहे,' असा सावधानतेचा इशाराही प्रा. मोहिते यांनी दिला. शेताच्या बांधापर्यंत पोहोचलेली ही वनस्पती तण माजून शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरू शकते. परागीकणामुळे स्थानिक स्वकुळातील वनस्पतीबरोबर त्याचा संकर (हायब्रिडायझेशन) झाला तर वेगळेच तण निर्माण होईल, अस मतही त्यांनी नोंदवले.उपटून जाळणे हाच पर्याय..
साताऱ्याचे माजी मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे म्हणाले, कोणतीही परदेशी वनस्पती आपल्याकडे घेताना ती उपद्रवी ठरेल का, याची तपासणी व विचार करून मगच ती स्वीकारायला हवी. आपल्याकडील पर्यावरण विषय कायदे अस्तित्वात असताना ते कागदावरच राहिले आहेत. वाऱ्यामुळे, अंगावरच्या कपड्यांना चिकटून, गाडीच्या चाकाला लागून, परागीभवनामुळे या धोकादायक वनस्पतीचा प्रसार वाढत आहे. काही लोक या फुलांच्या सौंदर्यावर भाळून कात्रजच्या घाटात बिया गोळा करतात. नंतर पुणे-कोल्हापूर महामार्गाच्या दुभाजकात टाकतात. कोणत्याही तणनाशकाचा यावर उपाय होणार नाही. उपटून जाळून टाकणे हाच त्याला पर्याय आहे.