सातारा - कराड येथील विमानतळावर दमनिया एअरवेजच्या माध्यमातून लवकरच फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार असून विमानतळावर चाचणीही घेण्यात आली. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण व दमानिया एअरवेजचे परवेज दमानिया यांनी कराड विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
दमानिया एअरवेज फ्लाईंग अकॅडमी
कराड विमानतळ हे गोवा आणि पुणे विमानतळाला मध्यवर्ती आहे. गोवा आणि पुणे विमानतळावर हवाई दलाचा वाहतूक वापर मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे खाजगी विमान वाहतुकीला परवानगी दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर कराड विमानतळावर दमानिया एअरवेजच्या माध्यमातून फ्लाईंग अकॅडमी सुरु करण्यासाठी चाचणी घेण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण यांनी फ्लाईंग अकॅडमीसाठी दमानिया एअरवेजला संपूर्ण
सहकार्य केले होते. त्यानुसार परवेज दमानियांसह कंपनीच्या अन्य सहकाऱ्यांनी कराड विमानतळावर एक विमान घेऊन पाहणी केली.
प्रगतीचे नवे दालन
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी बोलून आवश्यक तशी परवानगी घेऊन ही अकॅडमी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे सहकार्य मिळत असल्याचे दमानिया यांनी सांगितले. कराड विमानतळ हे फ्लाईंग अकॅडमीसाठी योग्य आहे. या अकादमीमध्ये स्थानिकांसह देशभरातून विद्यार्थी प्रवेश घेतील. विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन खासगी विमान कंपन्यांमध्ये त्यांना संधी मिळू शकेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या कोर्सच्या माध्यमातून कराड परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. त्याचबरोबर प्रगतीचे नवे दालन खुले होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे संचालक मनोज प्रधान, विनोद मेनन, मिहीर भगवती उपस्थित होते.
हेही वाचा - मद्रास उच्च न्यायालयाची 'सीरम' आणि आयसीएमआरला नोटीस