सातारा - जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहीवडी नगरपंचायतीच्या एक नगरसेविका आपल्या पतीसह मुलीचे सामान आणायला पुण्याला गेले होते. पुण्याहून परत येताना नगरसेविकेचे पती मुलीच्या सामानासह कोरोनाला घेवून आले. नगरसेविकेचे पतीच कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्याने दहिवडी नगरपंचायत लॉकडाऊन करण्यात आली आहे. कामानिमित्त नगरसेविकेचे पती हे अनेकदा नगरपंचायतमध्ये येत असल्याचे दिसून आले आहे.
दहिवडीमधील नगरसेविकेची मुलगी वाघोली (पुणे) येथे शिक्षणासाठी आहे. लाॅकडाऊनमुळे सदर मुलगी गावी आली होती. त्या मुलीचे साहित्य आणण्यासाठी गुरुवारी (९ जुलै) सकाळी साडेनऊ वाजता स्वतःच्या चारचाकीतून नगरसेविका, पती, मुलगी व चालक यांच्यासह वाघोली पुणे येथे गेले. मुलीच्या खोलीवर जावून शैक्षणिक साहित्य घेवून हे सर्वजण त्याच दिवशी परत दहिवडीला आले. त्याच दिवशी रात्री नगरसेविकेच्या पतीला श्वसनाचा त्रास होवून धाप लागली.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे जावून तपासणी केली व स्वॅब दिला. त्यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. त्यामुळे दहिवडी शहराच्या चिंतेत भर पडली. त्यांचा सहवास आल्याने दहिवडी नगरपंचायत देखील बंद करण्यात आली आहे.