सातारा- पोलीस कवायत मैदानावर पोलिसांसाठी ३० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. राज्यात पहिल्यांदाच पोलिसांसाठी असे कोविड सेंटर जिल्ह्यात निर्माण करण्यात आले आहे. या सेंटरचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
रुग्णालय सर्व सुविधायुक्त असून पोलीस दल अथवा त्यांच्या कंटुंबातील कोणी आजारी पडल्यास त्यांना येथे चांगले उपचार मिळेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवून उपक्रमाचे कौतुक केले.
या आहेत सुविधा..
रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधारण बेड, एक्स-रे मशीन, ईसीजी मशीन, कार्डियाक रुग्णवाहिका (२४ तास उपलब्ध) इत्यादी सुविधा आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये ३५ बेडची क्षमता असून उपलब्ध बेड संख्येपैकी ५० टक्के बेड हे पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरिता राखीव व ५० टक्के नागरिकांकरिता उपलब्ध असणार आहेत. सातारा मेडिकल असोसिएशन मधील एकूण ११ डॉक्टर्सचा समूह याचे व्यवस्थापन पाहणार असून काही पूर्ण वेळ तर काही व्हिजिटिंग फॅकल्टी असणार आहेत. ३ शिफ्टमध्ये या ठिकाणी काम चालणार आहे.
लोकार्पणाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्ह्याधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
हेही वाचा- साताऱ्याच्या राजघराण्यातील स्नुषा चंद्रलेखाराजे भोसले यांचे निधन