कराड (सातारा) - कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. मालट्रकने दुचाकीला धडक देऊन दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले. नबीलाल महमंद नदाफ (वय 65) आणि अन्वरबी नबीलाल नदाफ ( दोघेही रा. काले, ता. कराड), अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर चालक, ट्रक तेथेच सोडून पसार झाला.
कराड तालुक्यातील काले गावचे रहिवासी असलेले नबीलाल नदाफ आणि त्यांची पत्नी अन्वरबी हे दुचाकीवरून कराडला येत होते. कोल्हापूर नाका येथे त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या मालट्रकने धडक दिली. अपघातानंतर ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघातामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली. तसेच वाहतूकही ठप्प झाली होती. तसेच अपघातग्रस्त ट्रक तेथेच सोडून चालक पळून गेल्यामुळे पोलिसांनी तो ट्रक पोलीस ठाण्यात आणला.
कोल्हापूर नाक्यावरील भीषण अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील तसेच अपघात विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने आणि मृतदेह बाजूला काढले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अपघात विभागाचे हवालदार प्रशांत जाधव, खलिल इनामदार हे तपास करत आहेत.
हेही वाचा - व्हॉटस्अप ग्रुपवर अश्लिल व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल
हेही वाचा - ईटीव्ही भारत स्पेशल : तब्बल २३ वर्षांपासून रखडलेलं १.३६ टीएमसीचं महू-हातगेघर धरण, लिम्का बुक घेणार नोंद