सांगली - पाण्यासाठी दुष्काळी जत नगरपरिषदेला नगरसेवकांनी टाळे ठोकले आहे. संतप्त नगरसेवकांनी पालिकेच्या दारात ठिय्या मारत जत शहराला तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत शहराला आता पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात गेल्या ८ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या जत शहराच्या ३ नगरसेवकांनी जत नगरपरिषदेला टाळे ठोकले आणि आक्रमक भूमिका घेत नगरपरिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. यामुळे ३ तास परिषदेचे कामकाज बंद पडले होते.
जत शहरात सरकारी २१० पाण्याचे हातपंप आहेत. मात्र, त्यातील ७० हातपंप हे बंद अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती केली जात नाही. दुसरीकडे ८ दिवसातून पाणी पुरवठा केला जात असल्याने जतच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे जत नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात जतच्या नगरसेवकांनी निषेध नोंदवत तातडीने पाणी द्यावे या मागणीसाठी थेट नगरपरिषदेला टाळे ठोकले.