कराड (सातारा) - गृह विलगीकरणात ठेवलेल्या कराड शहरातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेस रुग्णवाहिकेतून न नेता तिच्या घरापासून स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयापर्यंत चालवत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी समोर आला आहे. या घटनेची तक्रार सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच महिलेला चालवत नेल्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे.
सहा दिवसांपूर्वी कोरोनाची तपासणी करून संबंधित महिलेस गृह विलगीकरणात ठेवले होते. गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता त्यांच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यानंतर घरापासून त्या महिलेस रुग्णालयापर्यंत चालवत नेण्यात आले. तिच्या समवेत कराड नगरपालिकेचे कर्मचारीही होते. कोरोनाबाधित महिलेस चालवत नेले जात असतानाचे मोबाईल चित्रीकरण कराडमध्ये वेगाने व्हायरल झाले. याप्रकरणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास चालवत नेण्याचा प्रकार गंभीर आहे. संशयितांना केवळ गृह विलगीकरणात ठेवले आहे. वास्तविक त्यांना रुग्णालयातच विलगीकरणात ठेवायला हवे होते. मात्र, तसे का केले गेले नाही. त्यामध्ये दोषी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी देखील नागरिक करत आहेत.
दरम्यान, यासंदर्भात उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांनी खुलासा केला. पॉझिटिव्ह रुग्ण आणण्याची जबाबदारी नागरी आरोग्य केंद्राची असते. रुग्ण आणण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी करायला पाहिजे होती. मात्र, तशी मागणी केली नाही. रुग्णास चालवत आणण्यात आले. रुग्ण प्रत्यक्ष उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण आल्याचे आम्हाला सांगण्यात आले. रुग्णांची माहिती उपजिल्हा रूग्णालयास कळविण्यात आली की त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते, असे डॉ. प्रकाश शिंदे म्हणाले.