सातारा Ajit Pawar : वक्तशीर, स्पष्टवक्ता, हजरजबाबी, प्रशासनावर पकड, आक्रमक नेतृत्व, कामाचा जागेवर सोक्षमोक्ष लावणारा धडाकेबाज नेता म्हणजे अजित पवार! वादग्रस्त वक्तव्यांमुळं ते अनेकदा अडचणीत सापडले आहेत. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात पुन्हा त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
मी काय धरणात *** का? : ६ एप्रिल २०१३ : दुष्काळी परिस्थिती असताना इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथील जाहीर सभेत बोलताना 'धरणात पाणी नाही तर मी काय धरणात *** का?, असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. त्यावेळी शिवसेना, भाजपा, मनसेने तीन दिवस सभागृहाचं काम बंद पाडलं होतं. आपल्या वक्तव्याचे प्रायश्चित्त म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी (१४ एप्रिल २०१३) सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत (प्रीतिसंगम) यशवंतरावांच्या समाधीस्थळी दिवसभर पाणी न पिता त्यांनी आत्मक्लेश केला होता.
विरोधकांकडून गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न : 15 एप्रिल 2013 : अजित पवार आत्मक्लेशासाठी बसलेल्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी भाजपा, शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर 'आपल्या राजकीय कारकिर्दीतली ही सगळ्यात मोठी चूक घडली, असून मला माफ करा', असा माफीनामा त्यांनी विधानसभेत सादर केला होता. जो काम करतो, तोच चुकतो. मी प्रायश्चित्त घेतोय. हा पब्लिसिटी स्टंट नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं.
त्याअर्थी मीही टग्याच...: 2014 : तासगाव अर्बन बँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी टगेगिरीचा उल्लेख केला होता. ‘एक वेळ आमदार-खासदार म्हणून निवडून येणं सोपं, मात्र, तालुका पातळीवर निवडून येण्यासाठी गावानं ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी तालुका पातळीवर निवडून आलो आहे…; त्याअर्थी मीही टग्याच आहे, असं अजित पवार म्हणाले होते.
कुणाबरोबर गुलुगुलू करता, 'हे' आता कळेल : 4 जून 2022 - पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फटकेबाजी करण्याच्या नादात अजितदादांनी म्हटलं होतं, 7 हजार 600 कॅमेरे बसणार आहेत. त्यामुळं तुम्ही रात्री कुठे जाता, कुणाबरोबर फिरता, गार्डनमध्ये कुठे, कुणासोबत गुलुगुलू करता, हे सगळं कळणार आहे. त्यांच्या भाषणाला प्रचंड टाळ्या पडत होत्या. त्यावर पवार म्हणाले, नेता टाळ्या पडल्या की खूश होऊन घसरायला लागतो, पण मी आता चुकणार नाही. एकदा माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. त्याचं प्रायश्चित अजून करतोय. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जाऊन आत्मक्लेश केला. पण आता चुकायचं नाय...आता चुकायचं नाय, असं सारखं म्हणत असतो.
सकाळ-संध्याकाळ आत्मक्लेश करावा लागेल : 25 नोव्हेंबर 2023 : आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय नेत्यांकडून सध्या खालच्या पातळीवरची वक्तव्ये सुरू आहेत. त्यांना आत्मक्लेश करायला प्रीतिसंगमावर यावं लागेल का? असा प्रश्न आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावर 'नुसतं समाधीवर येऊन आत्मक्लेश करून भागणार नाही, तर दररोज सकाळ-संध्याकाळ समाधीवर येऊन आत्मक्लेश करावा लागेल', अशी खोचक प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. त्यांचा रोख साहजिकच अजित पवारांकडं होता. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर महिन्यातच अजित पवारांनी अधिवेशनात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा -
- अमोलच्या आईला हुंदका आवरेना म्हणाल्या, "भरतीसाठी गावोगावी भटकत होता, देशसेवा करायची होती", ETV Bharat शी Exclusive बातचित
- ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो; सुधाकर बडगुजर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण
- ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची माहिती खोटी - सुषमा अंधारे