सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि ठाकरे गटाने येत्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जावे, अशी विचारधारा आमच्यात आहे. त्यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती शरद पवार यांनी कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मतदार संघांचा आढावा घेणार : शरद पवार म्हणाले, सध्या तरी आम्ही मतदार संघनिहाय आढावा घेतलेला नाही. पण तो घ्यावा लागणार आहे. भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला असल्याबाबत विचारले असता 'कोण तयारीत आहे, हे निवडणूक निकालातून दिसले आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
कारवाईचा फेरविचार करावा : अलिकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक जणांवर कारवाई केली आहे. काही लोकांना अटक करून त्यांच्यावर खटले दाखल केले, परंतु त्यातील काही जण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती ९ पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे देऊन फेरविचार करण्याची विनंती पत्रात केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्तक्षेपामुळे तेढ : राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा मुद्दाही पत्रात नमूद करण्यात आला आहे. केंद्र, राज्यांमध्ये राज्यपालांमुळे तेढ निर्माण होत, असल्याची बाब पत्राद्वारे मोदींच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली असल्याचे पवार म्हणाले.
तक्रारदारच जज झाले तर कसे होईल : ज्या लोकांनी समिती नेमा आणि संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनाच त्या समितीत घेतले आहे. एखाद्याने तक्रार केली असेल, तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच जज म्हणून नेमले तर त्याचा निकाल कसा लागेल, असा उपरोधिक सवाल शरद पवार यांनी केला.
कांदा खरेदी सुरू करा : केंद्राची नाफेड संस्था आहे. शेती मालाचे भाव पडतात तेव्हा नाफेड बाजारात खरेदीसाठी उतरते. नाफेडने कांदा खरेदी करावा. नाफेडने खरेदी केली तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकतो. कांदा हे उत्पादन देणारे त्यांचे एकच पीक आहे. कांदा खरेदी सुरू केली असल्याचे केंद्राने म्हटले आहे, पण खरेदी सुरू झाली नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली.