कराड (सातारा) - केंद्रासह राज्य सरकारने लॉकडाऊन शथिल केला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातसुद्धा १ ऑगस्टपासून नवीन आदेश अंमलात येणार आहे. परंतु, सर्व काही सुरळीत झाले, असा अर्थ काढू नये. प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले, तरच अनलॉकला यश मिळेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराडच्या व्यापारी असोसिएशन सोबत झालेल्या चर्चेवेळी दुकाने उघडण्याची वेळ वाढवून किमान ८ तास करायला हवी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. त्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली. अनलॉक संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात शनिवार (दि. १) पासून सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.
नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याची नागरिक आणि व्यापाऱ्यांनी जाणीव ठेवून दुकानांमध्ये सामाजिक अंतराचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. कोरोनाचे संकट टळले नसून ते अधिक गडद होत चालले आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले, तरच अनलॉकला यश मिळेल, असे त्यानीं म्हटले.