सातारा - राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो’ यात्रा (Bharat Jodo Yatra) येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकविण्याचे काम करेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली. 'भारत जोडो' यात्रेबाबत माहिती देण्यासाठी साताऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मोदींकडून स्वायत्त संस्था काबीज - निवडणूक आयोगासह इतर संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काबीज केल्या असून महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय होत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पराभव करून लोकशाही टिकविण्याचे काम राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा करेल. तसेच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांना परत कसे आणण्याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २२ वर्षांनी पक्षाच्या घटनेनुसार झाली. मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष झाले असून त्यांच्या माध्यमातून पक्षाला चांगले दिवस येतील, असा विश्वास व्यक्त करून राहुल गांधी यांचीही ‘भारत जोडो’ पदयात्रा दि. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
राज्यातील सरकार म्हणजे तात्पुरती व्यवस्था - राज्यातील सरकार म्हणजे तात्पुरती व्यवस्था असल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईडीच्या तावडीतून सुटण्यासाठी हे डबल इंजिनचे सरकार बनले आहे. याचा फटका राज्याला बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार घालविण्यासाठी काँग्रेसलाच पुढाकार घ्यावा लागेल.