कराड (सातारा) - कोरोनासारख्या महामारीमध्ये विकासकामांच्या निधीवरून राजकारण करणार्या सत्ताधारी आघाडीच्या गटनेत्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाने पुराव्यासह पर्दाफाश केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीनुसार छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केट इमारतीवरील मजल्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाल्याचे पुरावेच सादर करत निधीचे श्रेय लाटणार्यांना चपराक दिली.
कराड नगरपालिकेत बहुमतात असलेल्या जनशक्तीचे कथित गटनेते राजेंद्र यादव हे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजी मार्केटसाठी आपल्या प्रयत्नातून निधी आल्याचा दावा करत आहेत. परंतु, मुख्याधिकार्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे 8.50 कोटी रुपये निधीच्या मागणीचे पत्र 13 जानेवारी 2021 रोजी दिले होते. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खास बाब म्हणून छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केटचा (व्हेजिटेबल आणि जनरल मार्केट फेज 1 व 2) मजला बांधण्यासाठी 2 कोटी रुपये निधीची मागणी 18 जानेवारी 2021 च्या पत्राद्वारे नगरविकास मंत्र्यांकडे केल्याचे पुरावे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी पुराव्यासह सांगितले.
कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न
जनशक्ती आघाडीने मागील निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचा वापर करून बहुमत मिळविले. परंतु, काही दिवसांतच त्यांनी गद्दारी केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारसीने मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने यांनी केली. कराड नगरपालिका राजकारणातील मूळ जनशक्ती आघाडीचे नाव राजेंद्र यादव यांनी हायजॅक केले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जनशक्ती आघाडीच्या मूळ नेत्यांचा सुद्धा त्यांनी विश्वासघात केला. ते कराडचा काय विकास करणार, असा सवाल नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेल्या निधीचे श्रेय लाटण्याचे आणि विश्वासघाताचे प्रकार बंद करावेत, असा इशाराही गुजर यांनी राजेेंद्र यादव यांना दिला.
पृथ्वीराज चव्हाण हे कराडच्या विकासाचा एक आश्वासक चेहरा आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी कराडला भरघोस निधी दिला आहे. ती कामे आजपर्यंत सुरु आहेत. मुस्लिम समाजाच्या विकासालासुद्धा त्यांनी झुकते माप दिले. मागणी केलेल्या प्रत्येक कामाला पृथ्वीराजबाबांनी निधी दिला असल्याचे काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी सांगितले.
जोरदार चपराक-
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील विकासकामांच्या निधीसाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रति माध्यमांसमोर सादर करून काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी कराडमधील विकासकामांचे श्रेय घेणार्यांचा पर्दाफाश करून त्यांना जोरदार चपराक दिली. त्यामुळे जनशक्तीचे कथित गटनेते राजेंद्र यादव आणि त्यांचे समर्थक नगरसेवक चांगलेच तोंडघशी पडले आहेत.