सातारा - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर व पाचगणी येथील घोडेस्वारी तसेच महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव बोट क्लब येथे नौका विहार पर्यटकांसाठी खुले करण्यास तसेच व्यवसाय सुरू करण्यास अटींसह परवानगी दिली आहे. घोडे चालक-मालकांना दर 15 दिवसाला कोविड चाचणी करावी लागणार आहे.
घोडेस्वारीसाठी असणार ही बंधने
घोडेस्वारीसाठी नगरपालिकेने घोडेस्वारांना 1 दिवसाआड 50 टक्के घोडस्वारांचे नियोजन करुन द्यावे. दररोज प्रत्येक पर्यटकांची नोंद ठेवणे घोडेस्वारांवर बंधनकारक असणार आहे. घोड्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी घोडे चालक अथवा मालक यांनी कोरोना चाचणी करावी. संघटनेमार्फत घोड्यांना क्रमांक देण्यात व दिलेल्या क्रमांकानुसारच घोडेस्वारी करणे बंधनकारक आहे. पर्यटकांचे तापमान 38 किंवा 100.4 अंश फॅरेनाइटपेक्षा जास्त असेल व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास अशा पर्यटकांना घोडेस्वारी करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा. सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असल्यास पर्यटकाला घोडेस्वारीसाठी प्रतिबंध असेल. घोडे चालक-मालकाने चाचणी न केल्यास परवाना रद्द केला जाईल.
नौका विहारासाठी असणारे ही बंधने
वेण्णा तलाव बोट कल्बवर रोज एका बोटीच्या फक्त दोन फेऱ्या होतील. एवढ्याच फेऱ्यांचे नियोजन पालिका करणार आहे. बोटिंगसाठी ऑनलाइन बुकिंग व ई-पेमेंट सुविधेला प्राधान्य असेल. पर्यटकांचे नाव, पत्ता, वय, तापमान व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागेल. एका बोटीत एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश असेल. बोटीत जास्तीतजास्त 6 पर्यटक व 1 चालक एवढ्यांनाच प्रवेश असेल. सहली अथवा मोठ्या समुहांना (ग्रुप) बोटिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
टॅक्सीला असणारी ही बंधने
बुकिंग ऑफिस येथे प्रत्येक पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासणी करणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास प्रवासाला प्रतिबंध असेल. रजिस्टर ठेवण्याचे बंधन टॅक्सीचालकांनाही आहे. एका टॅक्सीत एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश द्यावा. एका वेळी 3+1 प्रवासी बसतील. टॅक्सीत चालकाच्या बाजूला पर्यटकांना बसता येणार नाही. चालक व प्रवासी यांच्यात पार्टीशन व प्रत्येक फेरीवेळी निर्जंतुकीकरण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
हेही वाचा - कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी, दराने केली शंभरी पार