सातारा- नागरीकत्व सुधारणा आणि नोंदणी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. कराड शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत सुरू होते. कराडमधील मुख्य बाजारपेठेतील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली होती. बसस्थानक परिसरातील व्यवहार मात्र सुरळीत सुरू होते.
वंंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांनी कराडमध्ये व्यावसायिकांना पत्रके वाटून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. बंदमुळे पोलिसांनीही कराड शहरात चोख बंदोबस्त तैनात केला होता. बंदला कराडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रवासी वाहतूक सुरू असल्यामुळे बंदचा परिणाम फारसा जाणवला नाही. शाळा, महाविद्यालये सुरू होती. तसेच शहराच्या काही भागात अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.