सातारा- जगभर कोरोना आजाराने थैमान घातले आहे. मात्र, या आजारापेक्षा त्याच्या अफवेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच एक प्रकार दहिवडी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्याबरोबर घडला आहे. कोरोना नसतानाही त्यांना विनाकारण त्यांच्या नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींकडून विचारपूस करण्याकरिता फोन येऊ लागले आहेत.
डॉक्टर कारंडे दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण नसतानाही त्यांचे नातेवाईक तसेच जवळचे व्यक्तींकडून विचारपूस करण्याकरिता फोन येत आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या कारंडे दामपत्याने दहीवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दामपत्याच्या तक्रारीवरून दहिवडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात समाजामध्ये विनाकारण अफवा पसरवल्याबद्दल भा.द.विचे कलम ५०५/१ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दहीवडी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कारंडे दाम्पत्यांना कुठलाही आजार नसल्याची खात्री केली आहे. त्याचबरोबर, अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा- छत्रपती घराण्याचे कुलदैवत असणारे शिखर शिंगणापूर मंदिर बंद