सातारा - पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी पहाटे कराड तालुक्यातील मसूर- संजयनगर येथे घडली. दरम्यान, पत्नीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अश्विनी रमेश कदम, असे जखमी विवाहितेचे नाव असून याप्रकरणी पतीविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संशयित आरोपी रमेश कदम याचा मसूरमध्ये सलूनचा व्यवसाय आहे. 2015 पासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यावर कराडमधील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री त्याने पत्नी अश्विनीच्या डोक्यात दगडी पाट्याचे घाव घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संशयित आरोपीची सासू सुवर्णा दत्तात्रय सुर्यवंशी यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात जावयाविरूद्ध फिर्याद दिली आहे. त्यावरून रमेश मानसिंग कदम याच्याविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.