सातारा - कोणतीच लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात भरती न करता जवळच्या कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. कोणी गळ घालण्याचा प्रयत्न केल्यास अशांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधताना शेखर सिंह म्हणाले, काहीच लक्षणे दिसत नसलेले 'ए' प्रकारातील रुग्ण आहेत, ते सुद्धा रुग्णालयात भरती होण्याचा आग्रह धरतात. यापुढे कोणतीच लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधिताला रुग्णालयात भरती केले जाणार नाही. अशांना जवळच्या कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. कोणी गळ घालण्याचा प्रयत्न केल्यास अशांवर गुन्हे दाखल केले जातील.
डाॅक्टरांनी लक्षणे नसलेला बाधित रुग्ण म्हणून अभिप्राय दिल्यानंतर कृपा करुन नागरिकांनी कोरोना केअर सेंटरमध्ये जावे. विनाकारण रुग्णालयातील बेड आडवुन खरचं गरजू रुग्णाचे नुकसान करु नये, असे आवाहनही सिंह यांनी केले.
जिल्ह्यात बेड मिळत नसल्याच्या काही तक्रारी आल्या. आज जिल्ह्यात बेडची कमतरता नाही. सातारा, कराड या शहरात काही वेळा बेडची कमतरता भासते. त्याचा विचार करुन प्रशासनाने वेळोवेळी आणखी काही रुग्णालये कोविड रुग्णांसाठी अधिग्रहीत केली आहेत. त्यामुळे बेडची क्षमता वाढत राहणार आहे. शिवाय एक हेल्पलाईन सुरु करत आहोत. त्यावर बेडची उपलब्धता कोठे-कोठे आहे हे लोकांना घरबसल्या समजू शकेल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.