सातारा - लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कठोर कारवाई केली. याप्रकरणी ४८० जणांविरोधात जिल्हा व शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर निवडणूक पथकांनी विविध कारवायांतून सुमारे २८ लाख ६४ हजार ४८० रुपयांची रक्कम जप्त केली. तर ५७ लाख ७१ हजार रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या सूचनांचे पालन करत जिल्हा प्रशासनाने कारवाईची पावले उचलली आहेत. मतदारसंघातील निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरण पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले आहेत.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके -
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. नियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सातारा लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदारसंघनिहाय पथके नेमण्यात आली. यामध्ये ३२ भरारी पथके, ३३ स्थिर पथके, ३८ निगराणी पथके, ९ व्हिडिओ चित्रीकरण पथके तैनात करण्यात आली होती.
सिव्हिजील अॅप ठरले प्रभावी -
तलवार बाळगणे, वाळू चोरी प्रकरणी पाच अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहितेचे प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या सिव्हिजील अॅप प्रभावी ठरले आहे. टोल फ्री नंबरवरून २ हजार ७४५ नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधला आहे.
जिल्ह्यात ३ हजार ६०० बंदूक परवानेधारक आहेत. त्यापैकी २ हजार ७३४ जणांकडून बाँडवर लिहून घेण्यात आले. निवडणूक काळात गैरवापर केल्याने चार पिस्तूल, सहा तलवारी व चाकू, सात काडतुसे असा सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच काळात ६ हजार २९० रुपयांच्या गुटख्यावर कारवाई करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पथकाने कारवाईत भाग घेतला.