सातारा - जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून शंभरी पार केलेल्या कोरोनाने शुक्रवारी तब्बल 115 रुग्ण बाधित करत जिल्हावासियांच्या मनात धडकी भरवली. तर, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे फक्त सातारा आणि कराड शहरातील आकडे पाहत आहेत का..? इतर तालुक्यातील नागरिक तसेच प्रशासनाला वाऱ्यावरती सोडले का..? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अनेक तालुक्यात एकही कोरोनाबाधित नाही तरी देखील रेड झोन सारख्या अटी शर्ती त्या भागात अजून देखील पाहायला मिळत आहेत. या भागातील अटी काही प्रमाणात शिथील होणे गरजेचे आहे. मात्र, ते होताना दिसत नाही. निर्णय आणि शिथीलता फक्त मुख्य कराड आणि सातारा शहरापुरत्या मर्यादित आहेत का...? असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने मायक्रो कंटेंनमेंट झोन करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, मात्र थोडी शिथिलता मिळताच साताऱ्याचा आकडा वाढला. कराडने तर रेकॉर्ड ब्रेक करत आकडा थेट 86 गाठला.
इतर तालुक्यातील कोरोनाबाधित आकडा
फलटण तालुका -6, कोरेगाव तालुका- 1, जावली तालुका- 6, खंडाळा तालुका- 1, पाटण तालुका- 1 तर माण, खटाव, महाबळेश्वर, पाचगणी या तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तरी देखील या भागात आज ही अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा फक्त सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांना देखील कंटेंनमेंट झोन काय आणि सेवा काय याची तरी माहिती नागरिकांना मिळावी.
सातारा शहर व परिसरात 15 रुग्ण बाधित असल्याने कडक लॉकडाऊन पाळण्याशिवाय गत्यंतर नाही, याचे भान विसरत नागरिक गर्दी करतच आहेत. तर 85 चा आकडा पार केलेल्या कराडात मात्र मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आला. इतर तालुक्यातील अवस्था थोडी फार चांगली असली तरी त्या ठिकाणी देखील काही प्रमाणात जीवनावश्यक वस्तूबरोबर थोड्या बाजार पेठा उघडणे गरजेचे आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकरी वर्गाला दोन पैसे हाताला मिळतील. उपासमारीची वेळ तरी येणार नाही. म्हणून याकडे थोडं लक्ष मंत्री साहेब द्या...! असे म्हणायची वेळ आली आहे.