सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, उन्हाळा सुट्टीचा काळ घरीच गेला. या काळात ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील मुलांनी गावी आल्यावर पालकांना रब्बीच्या पिकाची काढणी, मळणी तसेच खरीप हंगाची पेरणीपूर्व मशागतीच्या कामात सहकार्य केले. नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या कार्यकाल उलटून गेला तरी अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे चिमुकली मुले राणामाळात आणि गुरा-ढोरांच्या मागे चकरा सुरू आहेत.
जून महिन्यात शाळा सुरू होताना आपल्याला नवीन वर्गात प्रवेश मिळणार, नवीन मित्र, नवीन करकरीत कोरी वह्या पुस्तके, नवीन शिक्षक या आनंदाने विद्यार्थी भाराहून जातात. पण त्याच्या या आनंदावर विरजण पडलेलं दिसत आहे. जून महिना संपून गेला तरी शाळेची घंटा वाजत नसल्याने चिमुरड्याचा दिवस शेतासह गुराढोरच्या पाठीमागे जात आहे. ग्रामीण भागात शेतीच्या आंतर मशागतिची कामे सुरू असल्याने पालकांना मुलांचा चांगलाच आधार मिळाला आहे.
ग्रामीण भागातील मुलांना शेतीची कामे तशी नवीन नाहीत. दरवर्षी सुट्टीच्या काळात शेतीची पेरणी, आंतरमशागत, काढणी इत्यादी कामात चिरमुरडे विद्यार्थी आपल्या पालकांना मदत करतच असतात. मात्र, यावर्षी शाळा सुरू नसल्याने त्यांचा सर्वात जास्त काळ शेतात काम करण्यात गेला.
शहरी भागातील मुले ऑनलाईन शिक्षणात मग्न असली तरी ग्रामीण भागात याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांची भिस्त फक्त शाळेवरच अवलंबून असते. मात्र, यावर्षी ग्रामीण भागातील चिमुकल्या जीवांच्या हाती वही, पेन, पुस्तकांच्याऐवजी खोरे, खुरपे आणि जनावंराची दोरी दिसत आहे.