सातारा - अपुरा अधिकारी- कर्मचारीवर्ग आणि साधनसामग्री, शस्त्रास्त्रांचा अभाव, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, हिस्त्र वन्यजीवांचे सानिध्य अश्या विचित्र परिस्थितीमुळे चोरट्या शिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. वन्यजीवांची चोरटी शिकार रोखण्याचे मोठे आव्हान वन्यजीव विभागापुढे आहे. वन्यजीव विभागाला मनुष्यबळाबरोबरच गनमॅनची आवश्यकता आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य व सांगली जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान हे नैसर्गिकरित्या निर्माण झालेले जंगल आहे. निमसदाहरित व दुर्गम डोंगराळ भागातील घनदाट जंगलामध्ये विविध प्रकारची जैवविविधता आहे. चांदोली-कोयनेत पट्टेरी वाघ, बिबटे, गवे, सांबर, अस्वल, रानडुक्कर, रानमांजर, कोल्हे, वानरे, मोर, रानकोंबडी, रानमांजर, विविध प्रकारचे पक्षी यांचा मोठ्या प्रमाणात संचार आहे.
कोयना अभयारण्याचे ४२३.५५ व चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७ चौरस कि. मी. क्षेत्राचा समावेश आहे. 'सह्याद्री'मध्ये शिवसागर जलाशयात वन्यजीव विभागाच्या गस्तीची बोट फिरत नाही, खर्च अधिक असल्याने ती क्षमतेने वापरली जात नाही, असा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : कराडमधील 44 हज यात्रेकरू अडकले तेहरानमध्ये
शिवसागर जलाशयाचे अवसरी, काटी, खुडूकलेवाडी या ठिकाणी पात्र अरुंद आहे. त्याचा फायदा उठवत काही लोक व्हडग्यांचा वापर करून शिवसागर पार करतात. आणि शिकार करून बाहेर येतात. वेळे, देऊर येथेही असेच प्रकार घडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पाली, जुंगटी तेथूनही शिकारी घुसण्याचे प्रकार कॅमेरा ट्रॅपमुळे उघड झाले आहेत. खेड-चिपळूण बाजूकडून कोयना, बामणोली भागात चोरवणे, तीवरे, तीवडे, रघुवीर घाट या भागातून चोरटे शिकारी येतात. अभयारण्यात मुक्काम करतात, शिकार करतात आणि निघून जातात. वनरक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे हे सर्व राजरोसपणे सुरू आहे.
जंगलातील वाघांचे अन्न कमी झाल्याने ते अन्नाच्या शोधात अभयारण्याबाहेर पडतात. असे वाघ, बिबटे तस्करांच्या विषप्रयोगाला बळी पडत आहेत. काही लोक परराज्यातून येऊन वाघांना व बिबट्यांना कणकीच्या गोळ्यातून विष घालून, जाळे लावून त्यांची हत्या करतात व त्यांचे कातडे, पंजा व नख्यांची तस्करी करून लाखो रुपये घेऊन पसार होतात. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे असे तस्करीचे प्रकार घडत आहेत. अभयारण्यात चोरट्या शिकारीमुळे वाघाचे व बिबट्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचे आढळते. सांगलीत काही वर्षांपूर्वी पकडलेल्या वाघाचे कातडे, नख्या, पंजाच्या तस्करीचे प्रकरण घडले होते. महाबळेश्वर तालुक्यात वर्षभर वळवन व घोणसपूर येथे 2 बिबट्यांच्या शिकारीचे प्रकार उघड झाले. यातून वन्यजीव सुरक्षीत नाहीत, हेच अधोरेखीत होते.
हेही वाचा - ...म्हणून वीर जीवा महालांच्या वारसांनी मानले 'ईटीव्ही भारत'चे आभार
'सह्याद्री' मध्ये ९ वनक्षेत्राची गरज आहे, मात्र ५ वरच कामकाज चालते. ६० वनरक्षक व फिरत्या पथकाला १ वनक्षेत्रपाल या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ११ अधिकाऱ्यांपैकी ६ जणांकडेच रिव्हाॅल्व्हर आहेत. प्रत्येक वनक्षेत्राला एक रायफल आवश्यक आहे. रात्रगस्तीला रायफलमॅन उपयोगी ठरतो. रात्रगस्तीला पथकात अधिकारी असतोच असे नाही अशावेळी रायफलमॅन गरजेचा ठरतो.
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांच्या संरक्षणार्थ केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते यांनी सांगितले, २७५ कॅमेरा ट्रॅप नुकतेच बसवले आहेत. २० सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी नाके व इतर संवेदनशील ठिकाणांवर लवकरच बसवले जाणार आहेत, ज्यामुळे 'सह्याद्री'च्या क्षेत्रात शिकाऱ्यांच्या घुसखोरीस प्रतिबंध होऊ शकेल.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीच्या लग्नात पोहोचले पोलीस; कराडच्या निर्भया पथकाने रोखला बालविवाह