सातारा - कराडमधील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कराड शहरात नव्याने 125 सीसीटिव्ही लावण्यात येणार आहेत. सिग्नल असलेल्या परिसरात पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टिमदेखील बसविण्यात येणार आहे.या दोन्ही कामांचा शुभारंभ नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते शनिवारी झाला. या दोन्ही सुविधांसाठी दीड वर्षे केलेल्या पाठपुराव्याला आता मूर्त स्वरूप आले असल्याची माहिती कराड नगरपालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली.
कराडमधील कृष्णा नाका, विजय दिवस चौक, कॉटेज हॉस्पिटल चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौक, भेदा चौक, कराडचे प्रवेशद्वार असलेला कोल्हापूर नाका परिसर, बसस्थानक परिसर, आझाद चौक, इदगाह मैदान परिसर, बैलबाजार रोड, शिवाजी स्टेडियम परिसर, जोतिबा मंदिर परिसर, टाऊन हॉल परिसर, दैत्यनिवारणी मंदीर चौक आणि शहराच्या वाढीव भागातील मुजावर कॉलनी, सुमंगलनगर, पोस्टल कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनीसह विविध चौकांमध्ये 125 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. फिक्स लेन्स, मोटरायझ वेरीफोकॅल आणि पीटीझेड, अशा अद्ययावत प्रकारचे हे कॅमेरे आहेत.
कराडमध्ये बसविण्यात येणार्या सीसीटीव्हीमध्ये रस्त्यांवरील वाहनांचे नंबर कॅप्चर करणारे हाय डेफिनेशन कॅमेरे आहेत. या कॅमेर्यांद्वारे शहरातील घडामोडींचे प्रक्षेपण कराड शहर पोलीस स्टेशनमधील स्क्रिनवर दिसणार आहे. कराडमधील शहरातील सिग्नल असणार्या ठिकाणी पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टिम बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सिग्नलवर नियमांचे पालन न करणार्या नागरिकांना पोलीस कंट्रोल रूममधून सुचना करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियम पाळण्याची शिस्त वाहनधारकांना लागेल. शहरात येणार्या आणि बाहेर जाणार्या रस्त्यांवर हाय डेफिनेशनचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्या कॅमेर्यांमध्ये वाहनांचे नंबर स्पष्टपणे दिसणार आहेत. त्यामुळे अपघात करून पळून जाणार्या आणि गंभीर गुन्ह्यातील संशयितांना पकडणे सोपे होणार होईल, असेही नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि पब्लिक अनाऊसमेंट सिस्टिम बसविण्याच्या शुभारंभप्रसंगी नगरपालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, पाणी पुरवठा सभापती सौ. अर्चना ढेकळे, अतुल शिंदे, किरण पाटील, शारदा जाधव, सौ. सुप्रिया खराडे, आशा मुळे, सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, शिवाजी पवार, सुहास पवार मुख्याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए. आर. पवार, अभियंता रत्नाकर वाढई, इलेक्ट्रिकल अभियंता धन्वंतरी साळुंखे, विशाखा पवार उपस्थित होत्या.