सातारा - कोरोनामुळे जमावबंदी आदेश असतानाही सदर बाजार परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बर्थडे बॉय प्रशांत पवारसह 14 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 4 जून) गुन्हा दाखल झाला आहे.
सर्व संशयित सदर बाजारचे
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर बाजारमधील सार्वजनिक ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक युवक एकत्र आले होते. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा जमाव बंदी आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी प्रशांत पवार, विजय पवार, नितीन पवार, अमित सोलंकी, लक्ष्मण जाधव, सलीम शेख, अमर पवार, गुलाब यादव, भारत सोलंकी (सर्व रा. सदर बाजार. सातारा) व त्यांच्यासोबतचे अनोळखी चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत हवालदार विशाल धुमाळ यांनी तक्रार दिली आहे.
भाजी व चिकन विक्रेत्यावर गुन्हा
निर्बंध असतानाही तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर पुलाखाली बसून भाजी विक्री करणाऱ्या तेजराज कृष्णात बरकडे (रा. ढगेवाडी लिंब, ता. सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वाढेगावच्या हद्दीत सातारा कंदी पेढे दुकानाजवळ आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलेश बबन लावडे (वय 30 वर्षे, रा. वाढेफाटा) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर चिकन सेंटर सुरू ठेवल्याप्रकरणी इर्शाद चांदगणी आतार (रा. बसप्पा पेठ) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - 13 दुचाकी चोरीसह एटीएम फोडणाऱ्या तिघांना अटक