कराड (सातारा) - उदमांजरांच्या शिकार प्रकरणी कराड तालुक्यातील ओंड गावच्या 10 जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. संशयीतांनी विंग (ता. कराड) येथील उसाच्या शेतात सात शिकारी श्वानांच्या साह्याने शिकार केलेली दोन मृत उदमांजरे ताब्यात घेण्यात आली आहेत.
कुत्र्यांच्या साह्याने दोन उदमांजरांची शिकार
विंग गावात शिकारी श्वानांच्या साह्याने उदमांजरांची शिकार करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहितीच्या आधारे वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. एका विहिरीजवळ दहा जण शिकारी कुत्र्यांसमवेत आढळले. त्यांच्याकडील पांढर्या पोत्यात मृत उदमांजरे होती. शिकारी श्वानांच्या साह्याने दोन उदमांजरांची शिकार करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने संशयीतांना ताब्यात घेऊन वन्यजीव अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन बापू देशमुख, गणेश किसन पवार, बाळू काळू जाधव, पोपट आण्णा देशमुख, राहूल शिवाजी पवार, सुनील राजाराम देशमुख, अजय राजाराम देशमुख, शिवाजी बापू देशमुख, रघुनाथ आण्णा देशमुख, राजाराम बापू देशमुख, अशी वनविभागाने ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत.