सातारा - धनादेश न वटल्याने बिग बॉसमधून पोलिसांनी अटक केलेल्या अभिजित बिचुकले याला शनिवारी तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली. यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दहा वर्षांपूर्वी त्याने पोस्टमनला मारहाण केली होती. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.
२८ हजारांचा धनादेश न वटल्याने अभिजित बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी बिग बॉसमधून अटक केली होती. जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी पोलिसांनी पूर्वी दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली. या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्याचे आदेश देण्यात आले. बिचुकलेने जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
या अर्जावर १८ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र, खंडणी प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीची तारीख शनिवार दिनांक ६ जुलै रोजी असल्यामुळे त्याला कळंबा कारागृहात जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी खंडणीच्या खटल्यातील तक्रारदार फिरोज पठाण यांची महत्त्वपूर्ण साक्ष झाली. बिचुकले याने खंडणीचे पैसे मागितले नाहीत, असा कुठलाही प्रकार घडला नाही, अशी साक्ष पठाण यांनी दिली.
अगोदरच तयारीने आलेल्या पोलिसांनी ही सुनावणी झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या शासकीय कामात अडथळा या गुन्ह्यात अभिजीत बिचुकलेला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने या गुन्ह्यातही बिचुकलेला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सोमवार, ८ ऑगस्ट रोजी खंडणीच्या प्रकरणातील सुनावणी होणार आहे.