सातारा - पुणे पदवीधर मतदार संघातील बहुचर्चित अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांचे पदवीधरच्या मतदार यादीतून नाव गायब असल्याचा प्रकार आज खुद्द त्यांनीच निदर्शनास आणून दिला. माझे नाव यादीतून गायब करुन भोंगळ कारभाराचे दर्शन घडले आहे, अशी प्रतिक्रिया उमेदवार बिचुकले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
मला मतदान करू न देण्याचा हा डाव - बिचुकले
राष्ट्रपतीपदापासून विविध निवडणूका लढवणारे आणि 'बिग बाॅस' मालिकेपासून चर्चेत आलेले अभिजित बिचुकले यांनी पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करत आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदान केंद्रावर ते त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांच्याबरोबर गेले होते. अलंकृता बिचुकले यांचे नाव यादीत सापडले. मात्र, अभिजित बिचुकले यांचे नाव यादीत नव्हते. अनेक ठिकाणी शोधूनही नाव मिळाले नाही. अलंकृता बिचुकले यांच्या नावाखाली 'नारायण बिचुकले' असे वेगळेच नाव दिसून आले.
हेही वाचा - मुलीकडून जीवाला धोका : अब्दुल रशीद; शेहलाने फेटाळले आरोप
या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना भोंगळ कारभाराचे खापर त्यांनी भाजप पक्षावर फोडले आहे. प्रशासनही या भोंगळ कारभाराला तितकेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रभर माझं नाव पोहोचलं आहे. त्यामुळे मला मतदान करू न देण्याचा डाव त्यांनी खेळला. तो यशस्वी होणार नाही, असा विश्वासही अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केला.
कोण आहेत अभिजित बिचुकले
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजित बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे. अभिजित बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना एकदाही यश आले नाही. मात्र, तरीही हार न मानता त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. २०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार, असे बेधडक वक्तव्यही त्यांनी केले होते.
हेही वाचा - महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपाचा कुटील डाव - सचिन सावंत