कराड (सातारा ) - पाटण तालुक्यातील मोरवाडी गावात सोमवारी सकाळी राहत्या घरात मायलेकांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. या घटनेनंतर ढेबेवाडी खोऱ्यात खळबळ माजली आहे. कमल ज्ञानदेव लोकरे (वय 66) मुलगा सचिन ज्ञानदेव लोकरे (वय 38) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेनंतर पोलिसही चक्रावून गेले होते. मात्र, चौकशीनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. लोकरे यांनी शिबिरात कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल यायचा होता. अहवाला पॉझिटिव्ह येईल, असा समज करून घेतल्याने ते तणावात होता. त्यांची मानसिक स्थितीही बिघडली होती. त्यांची वृध्द आईसुध्दा मानसिकदृष्ट्या कमकुवत होती. त्यांचे वडील कराडमधील दवाखान्यात अॅडमिट आहेत. सचिनचा भाऊही वडीलांच्या सेवेसाठी दवाखान्यात होता.
घरात आढळले मतदेह -
सचिन याने रविवारी मध्यरात्री शेजारी राहणार्या चुलत्यांच्या घराची कडी वाजवून त्यांना जागे केले. मला भिती वाटतेय. मला तुमच्या घरी झोपू द्या, असे तो म्हणत होता. मात्र, त्याची मानसिक स्थिती लक्षात घेऊन चुलत्यांनी समजूत घालून त्याला घरी पाठविले होते. सोमवारी सकाळी सचिनच्या घरातून धूर येत असल्याचे पाहून नागरीकांनी दरवाजा तोडून घरात जाऊन पाहिले असता सचिनसह त्याच्या आईचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला.
पोलिसांनी वर्तवला अंदाज -
घटनेनंतर ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घरात कागदाचे पुठ्ठे आणि अंथरूण जळाल्याचे दिसले. रविवारी रात्री सचिनने वाफारा घेण्यासाठी कागदाच्या पुठ्ठ्याचा ढिग करून त्यावर पाण्याचे पातेले ठेवले असावे. अंगावरील गोधडी पेटल्यानंतर तो आतील खोलीत पळाल्याने दोघांचाही भाजून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.