सातारा - विनापरवाना आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीवेळी एक बैलगाडा विहिरीत पडल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातार्यातील कोरेगाव तालुक्यात ( Bullocks Race Incident Satara ) घडली आहे. याप्रकरणी शर्यत आयोजकांसह पाच जणांवर वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
चाकोरी सोडून बैलगाडा विहिरीत पडला -
कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावात बुधवारी दुपारी विनापरवाना बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. शर्यतीवेळी ताबा सुटून एक बैलगाडा चाकोरी सोडून शेताच्या नजीक असलेल्या विठ्ठल पवार यांच्या विहिरीत पडला. या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. बैल बुजल्याने बैलगाडा चाकोरी सोडून धाऊ लागताच शर्यत शौकिन सैरावैरा पळाले. बैलगाडा शर्यत शौकिनांमध्ये घुसला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
गाडी चालक बचावला -
बिचुकले गावाच्या हद्दीत आयोजित केलेल्या शर्यतीवेळी बैल बुजले आणि शर्यतीची चाकोरी सोडून मैदानाच्या तीनशे मीटरवरील विहिरीत पडले. गाडी चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने तो बचावला. बिचुकले गावातील शेतकरी दत्तात्रय पवार यांच्या शेतात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
विनापरवाना शर्यतप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल -
नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना शर्यत आयोजित केल्याप्रकरणी बिचुकले गावचे पोलीस पाटील सचिन रामचंद्र कदम यांनी वाठार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संदीप नारायण मोहिते (रा. फडतरवाडी), दत्तात्रय बाळकृष्ण पवार (रा. बिचुकले, ता. कोरेगाव), लक्ष्मण दत्तात्रय झांझुर्णे (रा. तडवळे संमत, ता. कोरेगाव), आप्पा पैलवान (रा. कुमठे, ता. कोरेगाव) व अन्य एक, अशा पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. उपनिरीक्षक संदीप बनकर हे तपास करत आहेत.
हेही वाचा - Soldier Suicide Pune : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात २४ वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या