सातारा - बहीण-भावाचे नाते जपणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त साताऱ्यातील नेहा देशमुख या तरुणीने खास राखी तयार केली आहे. तिने पेरणीयोग्य बियांच्या साह्याने पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. गेली तीन वर्षे नेही ही पर्यावरणपूरक राख्या तयार करते. दिवसेंदिवस या राख्यांना मागणी वाढत आहे. नवी पिढी पर्यावरण सजग बनत आहे, हे सुचिन्ह असल्याचे तिचे म्हणणे आहे.
बहिणीची भावाला अमूल्य भेट
साताऱ्यातील विसावा नाका परिसरात राहणारी नेहा देशमुख ही व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. 'ईटीव्ही भारत'ने नेहाशी बोलून तिची या राखी मागची संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, ''आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्त्व आहे. या सणातून आपण निसर्गाला काय देऊ शकतो, या विचारातून बियाणांची राखी ही संकल्पना सुचली. पर्यावरणपूरक एखादी गोष्ट लोकांना दिली तर ती स्वीकारायला थोडा वेळ जातो. पण, आपली संस्कृती आणि पर्यावरण एकत्र आणले तर लोक लवकरच ते स्वीकारतात. त्यातून पेरणीयोग्य बियांच्या राखीची संकल्पना मूर्त स्वरूपात आली. रक्षाबंधन झाल्यानंतर त्या बी पासून एक रोप निर्माण होणार आहे. नवनिर्मिती ही बहिणीने भावाला दिलेली अमूल्य भेट असेल अशी या मागची माझी धारणा आहे.''
हेही वाचा-भाजपाने कितीही जनआशीर्वाद यात्रा काढली, तरी जनतेची तळतळाट लागणारच - भाई जगताप
5 बिजांच्या राख्या
या राखी सोबत बिजाची माहिती आणि त्याचे आयुर्वेदातील महत्त्व विषद करणारे माहिती पत्र दिले जाते. ज्यातून लोकांची जिज्ञासा जागृत होईल असेही नेहाने स्पष्ट केले. 'प्रदूषण कमी झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्यात माझे योगदान म्हणून मी या पर्यावरणपूरक राखी या उपक्रमात नेहा सोबत सहभागी झाल्याचे आकाश कदम याने स्पष्ट केले. नेहाला ही राखी बनवण्यासाठी तिचे आई-वडील, धाकटा भाऊ निनाद तसेच मित्र-मैत्रिणींची मदत होते. मधुमालती, पुत्रंजिवी, काकडी, घोसावळं आणि दोडका अशा पाच बियांच्या प्रकारापासून राख्या बनविल्या असल्याचे अनिकेत साळुंखे याने सांगितले.
हेही वाचा-राज कुंद्राला उच्च न्यायालयाचा दिलासा, मात्र जेलमधून नाही सुटका
नवनिर्मितीचा आनंद
समृद्धी कदम म्हणाली, आर्ट आणि क्राफ्टचा वापर करून त्यात बीज बसवणे ही संकल्पना फार सुंदर आहे. प्रत्यक्ष राखी बनवताना वेगळा आनंद मिळतो. पर्यावरणपुरक राखीमुळे प्रदूषण टाळण्या बरोबरच बहीण-भावाच्या हळुवार नात्याचा अंकुर आता प्रत्यक्ष जमिनीतून अंकुरणार आहे. सातारा बरोबरच सांगली, कोल्हापूर आणि नगर येथूनही या राखीला मागणी असल्याचे नेहा देशमुख हिने सांगितले.
हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप ५ च्या यादीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली!
गुजरातमध्ये महागड्या राखींना मागणी-
राखी सणानिमित्त सुरतमध्ये स्पेशल राखींना मागणी वाढली आहे. सुरतमध्ये गोल्ड, प्लॅटिनियम आणि डायमंड राखींची मागणी वाढली आहे. या राखींची किंमत 2,500 ते 5 लाखापर्यंत आहे. भाऊरायाला महागड्या राखींची किंमत देऊन अनेक बहिणी राखी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करू इच्छित असल्याचे दिसत आहे.