सातारा - व्यसनाची तलफ भागवण्यासाठी चोऱया, घरफोड्या ही गुन्हेगारांची लाईफस्टाईल झाली आहे. हे शौक करण्यासाठी वाहने चोरणाऱया, दानपेट्या आणि एटीएम फोडणाऱया तिघांच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. यातील एक अल्पवयीन मुलगा आहे. यापुर्वीही तो दोन घरफोड्यांच्या गुन्ह्यात पोलिसांना सापडला होता. गांजाच्या व्यसनासाठी तिघेही हे कृत्य करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा - पाणीपुरीचा ठेला ते रेस्टॉरंट... वाचा बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ५) रात्री शाहू कला मंदिराजवळील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटच्या पार्किंगमधून मध्यरात्री महिंद्रा मार्शल चारचाकी वाहन चोरण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हा चोरटा पोलिसांच्या हातात रंगेहाथ सापडला. अधिक तपासात चोरट्याने दोनच दिवसांपूर्वी अॅक्टीव्हा चोरल्याची कबुली दिली. या संशयिताने इतर दोघांच्या साथीने मागील आठवड्यात शुक्रवार पेठेतील विश्वविनायक मंदीराची दानपेटी चोरून त्यातील पैसे चोरले होते.
मंगळवार पेठेतील एसबीआय व राजधानी टॉवरमधील बँक ऑफ इंडीयाचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी इतर दोघांनाही ताब्यात घेतले आहे. चोरीची अॅक्टीव्हा व दानपेटीतील रक्कम असा एकूण ३४ हजार १३९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संशयितंपैकी एक १६ वर्षांचा मुलगा आहे. महानुभव मठाजवळील एका दुकानासह दोन घरफोड्यांच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. त्यामुळे तो सराईत आहे. तिन्ही संशयितांना गांजाचे व्यसन आहे. हे व्यसन भागवण्यासाठी तसेच छानछोकीसाठी ते चोऱया करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
अधिक तपासात या संशयितांकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस शहरात घडणाऱया गुन्ह्यच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत. ही कारवाई शाहुपूरीचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱयांनी यशस्वी केली.