कराड (सातारा) - कराड तालुक्यातील नारायणवाडी गावात दवाखाना चालविणार्या बोगस महिला डॉक्टरला कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णांवर उपचार करतानाच तिला पकडण्यात आले. सुवर्णा प्रताप मोहिते (वय 40, रा. रेठरे खुर्द, ता. कराड), असे बोगस महिला डॉक्टरचे नाव आहे.
बोगस रूग्ण पाठवून रचला सापळा
कराडजवळच्या नारायणवाडी गावातील पंत क्लिनिकमध्ये एक महिला रूग्णांवर उपचार करत असून सदरची महिला बोगस डॉक्टर असल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्रकुमार यादव यांना मिळाली होती. ही बाब त्यांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी बोगस रूग्ण क्लिनिकमध्ये पाठवून साध्या वेशात सापळा रचला. त्यावेळी बोगस डॉक्टर महिला रूग्णांवर उपचार करताना सापडली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी राजेंद्रकुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे उघड
काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोनाबाधित रूग्ण संख्या आणि मृत्यूदर वाढत आहे. अनेक बाधित रूग्णांनी पंत क्लिनिकमध्ये उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी राजेंद्रकुमार यादव यांना मिळाली. त्या आधारे त्यांनी पंत क्लिनिकला भेट देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेकदा क्लिनिक बंद असायचे. त्यामुळे यादव यांना क्लिनिकबद्दल शंका आली. त्यानंतर बोगस रूग्ण पाठवून पोलिसांच्या मदतीने या क्लिनिकवर छापा मारण्यात आला. सुवर्णा मोहिते हिच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे उघड झाले. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपचार घेतलेले रूग्ण हादरले
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू डांगे, अशोक भापकर आणि पोलीस कर्मचार्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे काले परिसरात खळबळ उडाली असून बोगस महिला डॉक्टरकडून उपचार घेतलेले रूग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हादरले आहेत.