सातारा- 'विधानसभेच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे त्यांनीच सत्ता स्थापन केली पाहिजे. मात्र, अजुन भाजप अथवा शिवसेनेने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. भाजपने सरकार स्थापण्यास नकार दिला. तर पुढचे पर्याय विचारात घेता येतील,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हेही वाचा- 'सरकारी यंत्रणा वापरून आमदार फोडाफोडी सुरू'
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या स्व. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळ्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी कराड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वाधिक आमदार निवडून आले असल्यामुळे सरकार स्थापण्याची जबाबदारी भाजपची आहे. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अद्याप भाजपला आमंत्रित केलेले नाही. भाजप आणि शिवसेनेचं काय ठरलंय, यावर बरंच काही अवलंबून आहे, असे जयंत पाटील म्हणाले. भाजप नेत्यांची आणि राज्यपालांची अजुन भेट झालेली नाही. म्हणजे राज्यपालांना काही तरी काम असेल. किंवा भाजपला आत्मविश्वास नसेल. किंबहुना शिवसेनेबरोबरची चर्चा अजुन पूर्ण झाली नसेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
भाजप शिवसेनेच्या निर्णयाची कदाचित वाट बघत असेल. कारण, शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकारच स्थापन होऊ शकत नाही. अस झालं तरी ते टिकू शकत नाही. त्यांच्या अंतर्गत चर्चेशी आमचा काही संबंध नाही. आता काही आमदारांना आमिषे दाखवायला सुरुवात झाली आहे. जो आमदार फुटेल, त्याला इतर पक्ष एकत्र येऊन पराभूत करतील. याचाही पुनरूच्चार जयंत पाटील यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचा एकही आमदार आमिषाला बळी पडून फुटणार नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता आहे. शिवसेनेने मागितलेला आणि शिवसेना-भाजपमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपने शिवसेनेला सत्तेत समान वाटा दिला तर राष्ट्रपती राजवटीकडे वाटचालीचा प्रश्नच उद्भवणार नाही. परंतु, जे ठरलेलं आहे. ते भाजप का करत नाही, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलेला नाही. आम्ही तो देण्याचा विचारही केला नाही. कारण, आम्हाला वास्तव माहित आहे, असे सूचक वक्तव्यही जयंत पाटील यांनी केले.